खामगांव दि. 10 : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या बुलडाणेकर प्रथमेश जवकार याचे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी अभिनंदन केले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा चीन येथील हांगझोऊ येथे सुरु आहे. या स्पर्धेत बुलढाणा जिल्हयातील अलमपूर ता. नांदुरा येथील प्रथमेश समाधान जवकार याने कंपाऊंड राऊंडमध्ये सांघिक प्रकारातील सुवर्ण पदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. यापुर्वी देखील प्रथमेशने पदक मिळविल्यानंतर खामगांव शहरात प्रथम आगमन प्रसंगी जंगी सत्कार करुन खामगांव शहरातून मोटरसायकल रॅली व्दारे मिरवणुक काढून सत्कार केला होता.
प्रथमेश जवकार हा बुलडाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत बुलढाणा तालुका क्रीडा संकुल समिती येथील खेळाडू असून आर्चरीचा नियमित सराव करतो. सन 2023 मधील हे त्याचे तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्ण आहे. यासोबत एक रौप्य, एक कास्य पदकाची कमाई त्याने केली आहे. सदर स्पर्धेसाठी त्याच्यासह दिल्लीचा अभिषेक वर्मा, नागपूरचा ओजस देवतडे यांच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरिया सारख्या बलाढ्य संघाला एकतर्फी मात दिली. प्रथमेशने लहानपनापासूनच ऑलिंपिक पदक ध्येय ठेऊन कारकिर्दीस सुरुवात केली आहे. जागतिक क्रमवारीत त्याने पहिल्या क्रमांकाचे ध्येय बाळगले आहे. त्यादृष्टीने सलग दोनवेळा पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव करीत स्वत:मधील गुणवत्तेची चुणूक दाखविली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या मानाच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवित त्याने अलमपूर या लहानश्या गावाचे नावं संपूर्ण जगामध्ये पोहचवले आहे.
प्रथमेश जवकारचे हार्दिक अभिनंदन –आ ॲड आकाश फुंडकर
RELATED ARTICLES